जोडीदारासह कुटुंबाला जेरीस आणण्याची चाल
प्रभात-वादामध्ये पती-पत्नी विविध ठिकाणी दाखल करतात दावे
पुणे, दि. १३ पती-पत्नीतील वादाचा फटका दोघांना तर बसतोच. मात्र, प्रतिस्पर्धी पक्षाला जेरीस आणण्यासाठी कुटुंबियांनाही यात ओढले जाते. जोडीदारासह त्याच्या नातेवाईकांना त्रास देण्यासाठी अनेक दावे दाखल केले जात आहेत. यामागे जोडीदार आणि नातेवाईक चकरा मारून कंटाळले पाहिजेत हा उद्देश असतो. विविध अर्जाच्या माध्यमातून पोटगी किंवा देखभाल खर्च लवकर मिळेल. तसेच दाव्यात लवकर तडजोड होईल या आशेने मुद्दाम विविध न्यायालयात दावे दाखल केले जातात.
मारहाण, विवाहितेचा छळ, कौटुंबिक हिंचासार, नांदायला येण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी, घटस्फोट, अंतरिम पोटगी यांसह अनेक प्रकारचे दावे दाखल केले जातात. पती, पत्नी असे दोघेही असे दावे दाखल करतात. ते करताना हे दावे मुद्दाम वेगवेगळ्या शहरात नोंदवले जातात. सासर, माहेर आणि कायमस्वरूपी राहत असलेले ठिकाण, नोकरी किंवा व्यवसायाचे ठिकाण, जिथे काही काळ संसार केला ते ठिकाण, अशा ठिकाणी दावे दाखल होतात.
‘‘एकाच कौटुंबिक वादात विविध ठिकाणी दावे दाखल करण्याचे प्रकार वाढले आहेत. शंभर प्रकरणातील दहा प्रकरणात असे होते. काही वेळा वाद विविध ठिकाणी झालेला असतो. त्यामुळे त्या-त्या न्यायालयाच्या हद्दीत दावे दाखल होतात. मुळात पती-पत्नीला कायद्याने काही हक्क, अधिकार दिले आहेत. त्याचा वापर करून असे दावे दाखल केले जातात. पती-पत्नी वेगवेगळ्या शहरात राहत असेल तर दोघेही आपल्या राहण्याच्या ठिकाणी दावा दाखल करतात. पत्नी दावा केला, तर पत्नी आपल्या वास्तव्याच्या ठिकाणी दावा वर्ग करून घेऊ शकते.’’
ॲड. राणी कांबळे, सोनावणे, समुपदेशक

