वर्षभरच केला संसार; सव्वातीन वर्षे सुरू असलेले भांडण अखेर मध्यस्थीने मिटले
लोकमत न्यूज नेटवर्क-भांडणातून काहीच निष्पन्न होणार नसल्याचे वकिलांनी केले समुपदेशन
पुणेः सव्वा तीन वर्षे वैचारिक मतभेद व स्वभावामुळे एकमेकांशी भांडणाऱ्या, न्यायालयीन लढा देणाऱ्या दाम्पत्याचे भांडण अखेर वकिलांच्या मध्यस्थीने मिटले. भांडण करून काहीही साध्य होणार नाही. दोघांना शारीरिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. आर्थिक नुकसानही होणार असल्याचे दोघांच्या वकिलांनी हे समुपदेशनाद्वारे पटवून दिले. त्यानंतर दोघे परस्पर संमतीने वेगळे झाले आहेत. एकमेकांच्या कुटुंबीयाविरोधात त्यांनी ७ दावे दाखल केले, ते आता माघारी घेण्यात येणार आहेत. पतीचे वकील ॲड. विकास ढगे पाटील आणि पत्नीच्या वकील ॲड. राणी कांबळे-सोनावणे यांनी मध्यस्थीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
राकेश आणि स्मिता (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. राकेश अभियंता असून, नामांकित कंपनीत चांगल्या पदावर कामाला आहे. ती एमपीएससीचा अभ्यास करत आहे. १० जानेवारी २०२१ रोजी दोघांचा विवाह झाला. एक वर्ष सुरळीत संसार सुरू होता.
राकेश आणि स्मिता यांच्यामध्ये १५ जानेवारी २०२२ पासून त्यांच्यात वाद सुरू झाले. एकमेकांच्या कुटुंबाच्या विरोधात त्यांच्याकडून दावे दाखल करण्यात येत होते. ती नवऱ्याच्या घरातच राहत होती. त्यासाठी तिने कौटुंबिक हिंसाचाराच्या दाव्यात आदेश घेतला होता. तसेच तिला दरमहा १२ हजार पोटगीही न्यायालयाने मंजूर केली होती. दोघातील वाद सुरूच होते. दरम्यान, दोघांच्या वकिलांनी समुपदेशन केले. भांडणातून काहीही निष्पन्न होणार नसल्याचे सांगितले. दोघांना पटले. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. अर्जानुसार पतीने तिला 10 लाख रुपये, स्त्रीधनातील 5 तोळे सोने आणि तिचे सर्व साहित्य परत दिले. घटस्फोटाच्या विचाराबरोबरच आणखीही अनेक बाबी ठरविण्यात आल्या. यामुळे दोघे परस्पर संमतीने वेगळे झाले आहेत.

